रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

अध्याय दहावा - विभूतियोग

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
विभूतियोग नावाचा दहावा अध्याय
श्रीभगवानुवाच ।
भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः ।
यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥        

श्री भगवान म्हणाले,
महाबाहु पार्था तू असशी माझा प्रिय मित्र
म्हणुनि सांगतो तुझ्या हितास्तव परमज्ञानसूत्र       
 

न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।
अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥           

कळलो नाही मी देवाना वा महर्षिंनाही
मूळ मीच सार्‍या देवांचे आणि ऋषींचेही             
 

यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् ।
असम्मूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥          

मज अजन्म अन् अनंत जाणी जो नर निर्मोही
मी जगदीश्वर कळते ज्या तो पापमुक्त होर्इ         
 

बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः ।
सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥         

मति, ज्ञान, संशयनिवृत्ती, क्षमा, सत्य, निग्रह,
सुखदु:ख तसे जननमरण अन् भय
, निर्भय भाव,     
 

अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः ।
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥        

समत्वबुध्दी, तृप्ति, अहिंसा, तप अन् दातृत्व,
यश
, अपयश या साऱ्यांचा हो माझ्यातुनि उद्भव     
 

महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा ।
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥     

चार महर्षी अन् सप्तर्षी तसे मनु समष्टी
(पाठभेद: सात महर्षी, चार पुरातन, तसे मनु समष्टी)
या सार्‍यांना जन्म मजमुळे
, अन् त्यातुन सृष्टी        

एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः ।
सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥        

माझ्या कर्मांवर, सामर्थ्यावर धरि विश्वास
तो होतो ममभक्तिपरायण कर्मयोगी खास           
 

अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥     

उगमस्थान मी अन् सार्‍यांचा माझ्यातुन उपज
बुध्दिवंत हे जाणुनि भजती भक्तीपूर्वक मज         
 

मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् ।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥     

भक्तिपूर्वक चित्त मजमधी गुंतवुनी सांगती
परस्परां मजविषयी
, आणि स्वत: त्यात रमती         

तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥       १० 

प्रेमाने जे योगि भक्त मम सेवेमधि गर्क
त्यांना मी मजकडे यायचा दावितसे मार्ग            १०
 

तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः ।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥       ११ 

त्यांवरती अनुकंपा म्हणुनी तदंतरी जातो
ज्ञानाच्या तेजाने तेथिल अंधारा हटवितो             ११
अर्जुन उवाच ।
परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् ।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥          १२ 

अर्जुन म्हणाला‚
अजर
, अमर, आदिदेव, दिव्य तुम्हि आहा सर्वव्यापी
परब्रह्म तुम्हि
, परमात्मा तुम्हि, परमधामही तुम्ही    १२
 

आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा ।
असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥      १३ 

ऋषी असित, देवल, देवर्षी नारद, व्यासमुनी
असेच म्हणती आणि ऐकतो तुमच्याहीकडुनी          १३
 

सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥      १४ 

सत्य हेच मज मान्य, केशवा, तुम्ही सांगता ते
व्यक्तिमत्व तुमचे ना माहित देवदानवाते            १४
 

स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥             १५ 

भूतमात्र निर्मिता सर्व तुम्हि जगत्पती माधवा,
तुम्हास अंतर्ज्ञाने कळते तुम्ही कोण
, देवा            १५
 

वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः ।
याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥    १६ 

कळल्या ज्या तुम्हा, सांगाव्या मजला मधुसूदन,
प्रवृत्ती तुमच्या ज्यायोगे राहता जग व्यापून          १६
 

कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् ।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥      १७ 

कसे करावे चिंतन, तुम्हा कसे आळवावे?
मज सांगा कुठकुठल्या रूपे तुम्हा ओळखावे
?         १७
 

विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।
भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥    १८ 

अपुल्या शक्ती आणि महत्ता सांगा विस्तारून
अमृतमय ते बोल ऐकण्या आतुर मम कर्ण           १८
श्रीभगवानुवाच ।
हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः ।
प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥    १९ 

श्री भगवान म्हणाले‚
हे कुरूश्रेष्ठा
, तुला सांगतो ठळक ठळक माझ्या शक्ती
विस्ताराला अंत न माझ्या अशिच माझी प्रवृत्ती       १९
 

अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।
अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥        २० 

मीच अंतरात्मा रे  ब्रह्मांडातिल साऱ्या भूतांचा
कुंतिसुता मी आदि
, मध्य मी, तसा अंतही मी त्यांचा २० 

आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् ।
मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥           २१ 

मी आदित्यांतिल विष्णू, अन् मीच सूर्य तेजसांतला
वाऱ्यामधला मरिचि मी
, तसा शशांक  नक्षत्रांमधला    २१
 

वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः ।
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥     २२ 

वेदांमध्ये सामवेद मी, देवांमधला देवेंद्र
इंद्रियांमधे मन
, अन् भूतांतिल जीवाचे मी केंद्र        २२
 

रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।
वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥       २३ 

रूद्रगणांचा मी शंकर, अन् कुबेर मी यक्षांमधला
अष्टवसूतिल पावक मी
, अन् मेरूही पर्वतांतला        २३
 

पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।
सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥       २४ 

पुरोहितांतिल मुख्य म्हणति ज्या तो मी आहे बृहस्पती
सेनानींमधि कार्तिकेय मी
, जलाशयांमधि सरित्पती     २४ 

महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥      २५ 

महर्षींमधी भृगुऋषी मी, ॐकार असे ध्वनींत मी
यज्ञांमधला जपयज्ञ
, हिमाचलहि तसा निश्चलांत मी    २५
 

अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः ।
गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥      २६ 

वृक्षांमध्ये वटवृक्ष, तसा नारद देवर्षींमधला
गंधर्वांमधि चित्ररथ
, तसा कपिलमुनि सिध्दांमधला     २६
 

उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ।
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ॥         २७ 

सागरातुनी निर्मिति ज्याची तो अश्वांतिल उच्चश्रवा,
हत्तींमधि ऐरावत
, तैसा नराधीप मी मनुज जिवां       २७
 

आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥     २८ 

शस्त्रांमध्ये वज्र, तसा मी कामधेनु गायींमध्ये
जीवनिर्मितीमधि मदन मी
, अन् वासुकि सर्पांमध्ये     २८
 

अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥        २९ 

नागांपैकी अनंत मी, अन् पाण्यासाठी वरूणहि मी
नियमनकर्ता यम मी आणिक
, पितरांमधला अर्यम मी २९
 

प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥       ३० 

नियंत्रकांतिल काळ मी, तसा दैत्यांमध्ये प्रल्हाद
पशूंमधी मी सिंह
, आणखी पक्षिगणांमधला गरुड      ३०
 

पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् ।
झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी ॥     ३१ 

वेगवान वारा मी, आणि शस्त्रधरांमधि दाशरथी
मत्स्यांमधे मकरमत्स्य
, अन् सरितांमध्ये भागिरथी    ३१
 

सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥     ३२ 

सृष्टीचा आरंभ, अंत, अन पार्था, मीच असे मध्य
विद्यांमधि अध्यात्म मीच
, अन् वादींमधला मी वाद   ३२
 

अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च ।
अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥         ३३ 

अक्षरांतला ‘अ’कार मी, अन् समासांतला मी द्वंद्व
अक्षय ऐसा काल मीच
, अन् ब्रह्मदेव मी चतुर्मुख     ३३
 

मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् ।
कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥   ३४ 

सर्वांसाठी मी मृत्यू, अन् येणार्‍यांस्तव जन्महि मी
श्री
, कीर्ति, वाचा, बुध्दी अन् धृती, श्रुती, नारींमधि मी  ३४
 

बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् ।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥          ३५ 

स्तोत्रांमधला बृहत्साम मी, अन छंदांमधि गायत्री
मासांमधला मार्गशीर्ष
, अन् ऋतूराज जो वसंत मी     ३५
 

द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥   ३६ 

कपटींसाठी द्यूत मीच, अन् तेजस्वींचे मी तेज
व्यवसायांतिल यशही मी
, अन् बलवानांचे मी ओज    ३६
 

वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः ।
मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥        ३७ 

वृष्णींचा वासुदेव मी, अन पांडवामधे धनंजय
मुनींमधी मी व्यासमुनी
, अन् कवींमधी शुक्राचार्य      ३७
 

दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् ।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥      ३८ 

दण्डकांतला दंड मी, तसा विजिगीषूंमधली नीति
गुपितांमध्ये मौन मीच
, अन ज्ञानींमधली विज्ञप्ती     ३८
 

यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥     ३९ 

आणि अर्जुना मीच आहे रे बीज भूतमात्रांचे या
माझ्याविरहित नसे कुणिहि तुला या इथे आढळाया    ३९
 

नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप ।
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥        ४० 

ना गणती अन् अंतही तसा नाही रे माझ्या रूपा
तुज सांगितली ती तर केवळ थोडिच रूपे
, परंतपा      ४० 

यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसम्भवम् ॥        ४१ 

सुंदर अन् तेजस्वी ऐशा असती ज्या सार्‍या गोष्टी
माझ्या तेजाच्या अंशांतुन होते त्यांची उत्पत्ती         ४१
 

अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥     ४२ 

तरी अर्जुना, हवे कशासाठी हे विस्तारित ज्ञान
अंश सूक्ष्मसा माझा राही जगताला या व्यापून        ४२
 

इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥  

अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
विभूतियोग नावाचा दहावा अध्याय पूर्ण झाला.

६ टिप्पण्या:

  1. डॉ. प्रियंवदा कोल्हटकर विपत्रातून कळवतात:

    हा माझा आवडता अध्याय आहे. छान होतंय भाषान्तर. आपण आवर्जून पाठवता याबद्दल धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  2. मी आपला आभारी आहे प्रियंवदाजी.

    उत्तर द्याहटवा
  3. श्री सुभाष फडके विपत्राद्वारे कळवतात:

    श्री. मुकुंदजी,
    दहाव्या अध्यायाचा भावानुवाद फारच छान वाटला.

    यात एकच त्रुटी लक्षात आली आहे. श्लोक ६ मध्ये चार महर्षी अन् सप्तर्षी तसे मनु समष्टी असे आपण लिहिले आहे. खरे तर महर्षयः सप्त म्हणजेच सात महर्षी होतात आणि चत्वारो पूर्वे म्हणजे पूर्वी होऊन गेलेले चार (सनकादिक) तथा मनवः म्हणजे मनु हे सगळे माझ्यामुळे उत्पन्न झाले आहेत असा अर्थ होतो. पटल्यास सुधारणा करा.
    सुभाष फडके

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रिय सुभाषजी,
      आपल्या चोखंदळ आणि जाणकार नजरेतून ही त्रुटी चुकणार नाही ही खात्री मला होतीच. त्यामुळे मी आपल्या अभिप्रायाची नेहमीप्रमाणे प्रतीक्षा करत होतो. आपण आपले निरिक्षण आवर्जून कळवता याची मला अपूर्वाई वाटते आणि त्यामागील 'हा भावानुवाद निर्दोष व्हावा ही' कळकळीची भावना उमजून मन भरून येते. असाच लोभ असू द्यावा.
      आता या श्लोकाच्या मला उमगलेल्या अर्थाविषयी:
      पहिल्या मन्वंतरातील मरीचि, अत्रि, अंगिरस, पुलह, क्रतु, पुलस्त्य आणि वशिष्ट हे सप्तर्षी महर्षी आहेतच शिवाय त्यांच्याही पूर्वी होऊन गेलेले सनक, सनद, सनातन आणि सनत्कुमार हे चार ऋषी देखील महर्षी आहेत. हे पूर्वीचे चार महर्षी, नंतरचे सात (सप्तर्षी) महर्षी तसेच (प्रचलित कल्पापर्यंतचे सात) मनु हे समस्त (समष्टी) असा या पहिल्या चरणाचा अर्थ मी लावला आणि म्हणून मूळच्या संस्कृत चरणाशी तंतोतंत जुळेल असा “सात महर्षी, चार पुरातन तसे मनु समष्टी” असा शब्दश: अनुवाद न करता “चार महर्षी अन सप्तर्षी तसे मनु समष्टी” असा केला. इथे वापरलेले महर्षी आणि सप्तर्षी हे शब्दप्रयोग वर्गीकरणदर्शक नाहीत. सप्तर्षी हा शब्द फक्त ऋषींची सात अशी संख्या दाखवतो. ही माझी भूमिका होती. तथापि आपल्या बहुमोल निरिक्षणाचा आदर म्हणून मी “सात महर्षी, चार पुरातन तसे मनु समष्टी” हे ओळ देखील पाठभेद म्हणून समाविष्ट करत आहे.
      पुन्हा एकदा धन्यवाद.
      मुकुंद कर्णिक

      हटवा
  4. श्री मुकुंद नवरे विपत्राद्वारे कळवतात:

    "सप्रेम नमस्कार .

    विभूतियोग हा गीतेतील महत्वाचा आणि सर्वांना चकित करणारा अध्याय आहे असे माझे मत आहे. याचा भावानुवाद आपण उत्तम रीतीने केला आहे. तरीपण मला खटकलेल्या दोन बाबी व त्यावर उपाय सांगत आहे. १. सातव्या श्लोकात आपण ' धरि जो विश्वास ' असे म्हटले तर अधिक गेयता येते. २. दहाव्या श्लोकात ' सेवेमधि गुंग ' म्हटल्यास पुढील ओळीत यमक चांगले जुळते. अर्थात योग्य वाटल्यास विचार करावा.

    मुकुंद नवरे "

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद नवरेजी,
      अशी दुरुस्ती करण्याची आवश्यकता वाटत नाही. क्षमस्व |
      मुकुंद कर्णिक

      हटवा