अथ श्रीमद्भगवद्गीतासु
उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
भक्तियोगो
नाम द्वादशोऽध्यायः ॥
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
भक्तियोग नावाचा बारावा अध्याय
अर्जुन उवाच ।
एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥ १
अर्जुन म्हणाला‚
“तुमची भक्ती सदैव करिती ते योगी, अथवा
अव्यक्ताक्षर ब्रह्मा पुजती ते योगी, केशवा?
या दोन्हीतिल श्रेष्ठ कोण ते मजसी सांगावे
योगाचा परिपूर्ण ज्ञानि कोणाला मानावे?” १
श्रीभगवानुवाच ।
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मताः ॥ २
श्री भगवान
म्हणाले‚
“माझ्या ठायी
राहुनी मजला श्रध्देने भजतो
अशा कर्मयोग्या मी, पार्था, श्रेष्ठ योगि मानतो २
ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगमचिन्त्यञ्च कूटस्थमचलन्ध्रुवम् ॥ ३
तरि, दर्शविता येइ न ऐशा अव्यक्ता भजती,
मूलभूत अन अचिंत्य अक्षर ब्रह्माला पुजती, ३
सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥ ४
इंद्रियनियमन
करूनी जे समबुध्दि ठेवतात
असे भक्त ब्रह्माचेही मज येउन मिळतात ४
क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ ५
मन ज्यांचे रमलेले असते अव्यक्ताठायी
देहधारींना त्या उपासना होइ कष्टदायी ५
ये तु
सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
अनन्येनैव
योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ ६
अर्पण करती अपुलि सारी कर्मे मजलागी
अन् मज भजती अनन्यभावे असे कर्मयोगी ६
तेषामहं
समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।
भवामि
नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥ ७
पार्था, त्याना मजठायी मी स्थान खचित देतो
विलंबाविना मर्त्यलोक मी त्यांचा सोडवितो ७
मय्येव
मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि
मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ॥ ८
सुस्थिर माझ्या ठायि चित्त तू ठेवी, धनंजय,
अंती येउन मिळशिल मजला यात नसे संशय ८
अथ चित्तं
समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन
ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय ॥ ९
आणि जरी असमर्थ ठेवण्या मजमधि स्थिर चित्त
उमेद धरुनी फिरुन यत्न कर करण्या मज प्राप्त ९
अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि
मत्कर्मपरमो भव ।
मदर्थमपि
कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ॥ १०
वारंवार प्रयत्नांतीही अपयशि जर होशी
माझ्यासाठी कर्मे करूनी सिध्दि प्राप्त करशी १०
अथैतदप्यशक्तोऽसि
कर्तुं मद्योगमाश्रितः ।
सर्वकर्मफलत्यागं
ततः कुरु यतात्मवान् ॥ ११
अन् हे सारे करण्यातहि तू असशिल असमर्थ
तर कर कर्मे त्यजुनि फलाशा स्थिरचित् बनण्यार्थ ११
श्रेयो
हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम्
॥ १२
यत्नापेक्षा
ज्ञान श्रेष्ठ अन् ज्ञानाहुनि ध्यान
ध्यानाहुनही
फलत्याग जो शांत करिल तव मन १२
अद्वेष्टा
सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो
निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १३
द्वेषमुक्तसा मित्र, कृपाळू , सर्वां समान मानी
ममत्वबुध्दीविरहित संतत, निरहंकारी, ज्ञानी १३
सन्तुष्टः
सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो
मद्भक्तः स मे प्रियः ॥ १४
सुखदु:खांप्रत निर्विकार जो दृढनिश्र्चयि, संयमी
असा भक्त जो नत मजसि त्यावर करि प्रीती मी १४
यस्मान्नोद्विजते
लोको लोकान्नोद्विजते च यः ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो
यः स च मे प्रियः ॥ १५
ज्या न टाळिती लोक आणि जो टाळि न लोकांना
हर्ष, क्रोध, भय, खेदापासुनि अलिप्त धरि भावना
असा भक्त जो कर्मफलाशामुक्त बनुनि राही
त्या माझ्या भक्तावर माझी प्रीति जडुनि राही १५
अनपेक्षः
शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारम्भपरित्यागी
यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १६
शुध्द, कुशल, निरपेक्ष, उदासिन सुख अन् दु:खामधी
फलदायक कर्मे त्यागी तो मम प्रियभक्तांमधी १६
यो न
हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।
शुभाशुभपरित्यागी
भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १७
हर्ष, खेद वा द्वेष, शोक अन् आकांक्षा टाळतो
शुभाशुभापलिकडे पाहतो तो मज आवडतो १७
समः शत्रौ
च मित्रे च तथा मानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु
समः सङ्गविवर्जितः ॥ १८
शत्रु–मित्र, अवमान-मान, अन् शीत–उष्ण, सुख–दुख
दोन्हींमधि समभाव राखुनी राही नि:संग १८
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी
सन्तुष्टो येन केनचित् ।
अनिकेतः
स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १९
स्तुति-निंदा सम मानी, मौनी, शांत, तुष्ट सतत
अनिकेत, स्थिरचित्त, भक्त मम प्रिय मज अत्यंत १९
ये तु
धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।
श्रद्दधाना
मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॥ २०
हा जो मी सांगितला, पार्था, अमृतमय धर्म
श्रध्देने आचरिति भक्त ते होती मज प्रियतम.” २०
इति श्रीमद्भगवद्गीतासु
उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
भक्तियोगो
नाम द्वादशोऽध्यायः ॥
अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
भक्तियोग नावाचा बारावा अध्याय पूर्ण झाला
कर्णिकजी , जय श्री कृष्ण ,
उत्तर द्याहटवादरवेळेला नेट ओपन करून वाचणे जमत नाही । यापूर्वी आपण मैत्री अनुदिनी मध्ये पण मराठी अनुवाद दिला आहे । या बाबतीत आपण पुस्तक रूपाने प्रकाशित केले असल्यास ते कायम स्वरुपी संग्रही ठेवता येईल । साध्या सोप्या भाषेत गीता असते आपुली । धन्यवाद व शुभ रात्रि ।
शांताराम सनेर
श्री मुकुंद नवरे कळवतात:
उत्तर द्याहटवा"सप्रेम नमस्कार.
भक्तियोग या अध्यायाचा भावानुवाद चांगला झाला आहे.
तरीसुद्धा १८व्या श्लोकातील पहिल्या चरणात मला गुणगुणताना अडचण आली (अक्षर संख्या जास्त) म्हणून खालील बदल सुचवत आहे.
शत्रु-मित्र, मानापमान, शीतोष्ण तथा सुखदुख ।
दोन्हीमधि समभाव राखुनी राही निःसंग ।।
योग्य वाटल्यासच विचार करावा.
मुकुंद नवरे"
मुकुंदजी,
हटवाआपल्याला आलेली अडचण समजली पण आपण म्हणता तसा बदल करणे योग्य वाटले नाही. तरीही थोडी सुधारणा केली आहे. आता गुणगुणून पहावे.
-मुकुंद कर्णिक.
श्री सुभाष फडके कळवतात:
उत्तर द्याहटवा"मुकुंदजी,
अतिशय उत्तम भावानुवाद आहे. एकोणिसाव्या श्लोकात थोडा बदल करता आला तर पहा. तुल्यनिंदास्तुति म्हणजे निंदा व स्तुती समान मानणारा हे व्यक्त होत नाही आहे. मौनी असणे (म्हणजे मननशील असणे) हा वेगळाच गुण आहे, ज्याला निंदा-स्तुतीशी जोडायला नको.
-सुभाष फडके"
सुभाषजी,
उत्तर द्याहटवाआपले अचूक निरिक्षण आणि सूचना आवडली. धन्यवाद. आता योग्य तो बदल केला आहे.
-मुकुंद कर्णिक