शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

अध्याय अकरावा - विश्वरूपदर्शन

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
विश्वरूपदर्शनयोगो नामैकादशोऽध्यायः ॥

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
विश्र्वरूदर्शन नावाचा अकरावा अध्याय
अर्जुन उवाच ।
मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम् ।
यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥       १

अर्जुन म्हणाला
अध्यात्माची तुम्ही कथिलि जी परमगुह्य गोष्ट
अनुग्रहित मी, मोह मनातिल झालासे नष्ट        १

भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया ।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥      २

कमलपत्रनेत्रा, जे मजला ऐकविले तुम्ही
जीवांची उत्पत्ति, विलय अन महानता तुमची       २

एवमेतद्यथात्थ त्वमात्मानं परमेश्वर ।
द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम ॥           ३

हे पुरूषोत्तम रूप ईश्र्वरी तुमचे जे वर्णिता
पाहु इच्छितो ते, परमेशा, समक्ष मी आता         ३

मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो ।
योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम् ॥       ४

प्रभो, शक्य हे असेल तर ते रूप दाखवावे
दिव्य आणि अविनाशि असे ते दर्शन मज द्यावे  ४
श्रीभगवानुवाच ।
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः ।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥       ५

श्री भगवान म्हणाले
पहा अर्जुना, नाना रंगी, विविध आकारांची
शेकडोच का सहस्त्र ऐशी ही रूपे माझी          ५

पश्यादित्यान्वसून्रुद्रानश्विनौ मरुतस्तथा ।
बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत ॥          ६

आदित्य, वसु अन् रूद्र, अश्र्विनी आणि मरूत्गण
पहा आज तू या सर्वांना, दुर्लभ हे दर्शन         ६

इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् ।
मम देहे गुडाकेश यच्चान्यद् द्रष्टुमिच्छसि ॥      ७

गुडाकेश, हे विश्र्व चराचर, अन् जे जे वांछित
ते ते सारे एकत्र पहा या मम देहात             ७

न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा ।
दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् ॥      ८

परंतु दिसणे दृष्टिस तुझिया अशक्य हे पार्थ,
म्हणुनी देतो दृष्टि दिव्य बघण्या मम सामर्थ्य”   ८
सञ्जय उवाच ।
एवमुक्त्वा ततो राजन्महायोगेश्वरो हरिः ।
दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् ॥            ९

संजय म्हणाला
हे राजा, इतके बोलुनि मग योगेश्र्वर हरिने
विश्र्वरूप पुले दाविले पार्थासी त्याने           ९

अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम् ।
अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ॥         १०

त्या रूपाला असंख्य तोंडे, नेत्रही अनेक
दिव्य आयुधे, अन् आभरणे अद्भुतशी चमक            १०

दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् ।
सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ॥          ११

विश्र्वमुखी त्या अनंत देही अनेक आश्र्चर्ये
दिव्य सुगंधी लेप, सुमनमाला नि दिव्य वसने     ११

दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता ।
यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥ १२

तेजस्वी कांती ऐसी त्या महान शक्तीची
हजार सूर्यांच्या तेजाहुनदेखिल जास्तीची          १२

तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा ।
अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा ॥           १३

दिव्य अशा त्या रूपामध्ये पार्था ये दिसुन
विभागलेल्या विश्र्वाचे होउनि एकीकरण          १३

ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः ।
प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत ॥          १४

शीर्ष नमवुनी वंदन करूनी मधुसूदनाला         
चकीत अन् रोमांचित अर्जुन मग वदता झाला    १४
अर्जुन उवाच ।
पश्यामि देवांस्तव देव देहे
सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ।
ब्रह्माणमीशं कमलासनस्थ-
मृषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् ॥           १५

अर्जुन म्हणाला,
श्रीकृष्णा, देही तव दिसति मजसि सर्व देव
कमलस्थित ब्रह्माही जो देवांचा अधिदेव
प्राणिमात्र सारे दृगोचर होति एकसाथ
वासुकिच्यासम दिव्य सर्पही साधूंसमवेत         १५

अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं
पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् ।
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं
पश्यामि विश्वेश्वर  विश्वरूप ॥           १६

अनेक बाहू, उदर, आनने, अनेक चक्षूही
सर्वतोपरी अनंत ऐसे रूप तव मी पाही
अंत, मध्य वा आरंभ कुठे तुझिया रूपाते
हे विश्र्वेश्र्वर, मज उमगेना कुठे पहावे ते         १६

किरीटिनं गदिनं चक्रिणं च
तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् ।
पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ताद्
दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् ॥                   १७

प्रदीप्तअग्नी अन् सूर्यासम अपार तेजस्वी
किरिट, गदा अन् चक्र धारिलेली ही तुमची छवी
साहु न शकती नेत्र प्रखरता रूपाची तुमच्या
तरी पाहतो जिकडे तिकडे तुम्हास, परमेशा        १७

त्वमक्षरं परमं वेदितव्यं
त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता
सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥             १८

परब्रम्ह जे जाणुन घ्यावे असे मला वाटते
ते तुम्ही अव्यय नि सनातन पुरूष, मला गमते.
शाश्र्वतधर्माचे रक्षकही तुम्हीच, भगवंता
समस्त विश्र्वासाठि तुम्हाविण नाहि कुणी त्राता    १८

अनादिमध्यान्तमनन्तवीर्य-
मनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् ।
पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं
स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ॥           १९

विनारंभ, मध्यान्ताविरहित, अनंतबाहु तुम्ही
चंद्रसूर्य हे नेत्र जयाचे आणिक मुख वह्नी
अती प्रखर तेजाने त्यांच्या विश्र्वा तापविता
अनंत शक्तिमान असे, भगवंता, मज दिसता       १९

द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि
व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः ।
दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं
लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ॥            २०

पृथ्वी आणि आकाशातिल अंतर आणि दिशा
सर्व टाकले व्यापुन केवळ तुम्हीच, परमेशा
रूप भयंकर तव हे अदभुत प्रचंड अन् उग्र
पाहुन झाले त्रिलोक भयभित आणि गलितगात्र    २०

अमी हि त्वां सुरसङ्घा विशन्ति
केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति ।
स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः
स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः ॥      २१

देवांचे समुदायहि तुमच्या ठायी प्रवेशती
भ्यालेले कुणि हात जोडुनी तुम्हाला प्रार्थिती
स्वस्ति, स्वस्ति करीत आणिक इतरहि स्तोत्रानी
तुमच्या स्तवनी रत झाले हे किती ऋषी अन् मुनी २१

रुद्रादित्या वसवो ये च साध्या
विश्वेऽश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च ।
गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा
वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥          २२

रूद्र, वसु, आदित्य, साध्यगण अन् अश्र्विनिकुमर
तसेच विश्र्वेदेव, मरूत्, सुर, पितर, यक्ष, असुर
गंधर्वादिक सिध्दिदेवता अचंबित होउनी
स्तब्ध राहिल्या विस्मयपूर्वक तुम्हां अवलोकुनी    २२

रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं
महाबाहो बहुबाहूरुपादम् ।
बहूदरं बहुदंष्ट्राकरालं
दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहम् ॥ २३

अनेक डोळे, मुखे, भुजा, अन् मांडया, अन् पाय
विशाल पोटे कराल दाढा, रूप महाकाय
भयव्याकुल झाले सारे हे त्रिलोकातले वासी
माझी पण झालेली आहे स्थिति त्यांच्याजैसी      २३

नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं
व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा
धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥ २४

आकाशा जाउन भिडलेले अनेक रंगाचे
जळजळीत नेत्रांचे आणि उघडया तोंडाचे
स्वरूप तुमचे पाहुनि ऐसे, हे विष्णूश्रेष्ठ,
सुटला माझा धीर जाहली शांतीही नष्ट          २४

दंष्ट्राकरालानि च ते मुखानि
दृष्ट्वैव कालानलसन्निभानि ।
दिशो न जाने न लभे च शर्म
प्रसीद देवेश जगन्निवास ॥        २५

प्रलयाग्नीसम तोंड आणखी दाढा विक्राळ
पाहुन अस्वस्थच मी झालो आहे गोपाळ,
डळमळीत झाले मन मजशी ना कळतात दिशा
प्रसन्न व्हा अन् कृपा करा मजवरती, जगदीशा     २५

अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः
सर्वे सहैवावनिपालसङ्घैः ।
भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ
सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥             २६

धॄतराष्ट्राचे पुत्र आणखी महीपालहि इतर
भीष्म, द्रोण अन् कर्णासह किति आमुचेही वीर     २६


वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति
दंष्ट्राकरालानि भयानकानि ।
केचिद्विलग्ना दशनान्तरेषु
सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः ॥            २७

शिरले तुमच्या विक्राळ मुखी अन् मजला दिसली
दाढांमध्ये कित्येकांची शिरे चिरडलेली            २७

यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः
समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति ।
तथा तवामी नरलोकवीरा
विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥         २८

लोट नद्यांच्या पाण्याचे जैं सागरात शिरती
तसे वीर हे तुमच्या जळत्या मुखि प्रवेश करती    २८

यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा
विशन्ति नाशाय समृद्धवेगाः ।
तथैव नाशाय विशन्ति लोकास्-
तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥           २९

ज्वालेमध्ये जळण्यासाठी पतंग घुसतात
                   तसे मराया लोक भराभर मुखि प्रवेशतात         २९

लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्-
लोकान्समग्रान्वदनैर्ज्वलद्भिः ।
तेजोभिरापूर्य जगत्समग्रं
भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥          ३०

हे विष्णू, प्रज्वलित मुखांनी गिळता सर्वांना
जिभल्या चाटित ज्वालांच्या, तुम्हि, उग्र तळपताना ३०

आख्याहि मे को भवानुग्ररूपो
नमोऽस्तु ते देववर प्रसीद ।
विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं
न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॥           ३१

वंदनपूर्वक प्रार्थितो तुम्हा, प्रसन्न तुम्हि व्हावे
उग्रस्वरूपी कोण आहा ते मजसी सांगावे
ही तुमची जी करणी आहे, मजला ना कळते
आदिपुरूष तुम्हि तरि उत्सुक मी तुम्हा जाणण्याते.” ३१
श्रीभगवानुवाच ।
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो
लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः ।
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे
येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥          ३२

श्री भगवान म्हणाले
मी संहारक काळ आहे रे साऱ्या विश्र्वाचा
आलो येथे विनाश करण्याला या लोकांचा
तुझ्याविनाही होणारच रे सर्वांचा नाश
दोन्ही सैन्यामधले योध्दे मरतिल हे खास        ३२

तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व
जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् ।
मयैवैते निहताः पूर्वमेव
निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥           ३३

तेव्हा, पार्था ऊठ आणि कर यशासाठि युध्द
जिंकुन शत्रूंना भोगाया राज्यहि मृथ्द               
मम इच्छेने पूर्विच यांचा मृत्यु असे झाला
निमित्त केवळ व्हायचे असे, सव्यसाचि, तुजला      ३३

द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च
कर्णं तथान्यानपि योधवीरान् ।
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा
युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् ॥          ३४
       
द्रोण, भीष्म अन् जयद्रथासह कर्ण आदि वीर
आधीच मी मारले तयां तू लढुनी वधी सत्वर
नकोस होऊ व्यथित तयांस्तव, मार संगरात
शत्रूंवरती विजय मिळवशिल तू या समरात.”            ३४
सञ्जय उवाच ।
एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य
कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी ।
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं
सगद्गदं भीतभीतः प्रणम्य ॥             ३५

संजय म्हणाला
ऐकुनी कृष्णाच्या बोला मग पुन:पुन्हा वंदुन
सद्गदित कंठाने बोले भयभितसा अर्जुन.”        ३५
अर्जुन उवाच ।
स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या
जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च ।
रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति
सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः ॥ ३६

अर्जुन म्हणाला
हृषिकेशा, जग होते आनंदित तुमच्या कीर्तनी
आणिक भारून जाते तुमच्यावरल्या प्रीतीनी
सिध्दपुरूषगण इथले सारे करति तुम्हा नमन
राक्षस पळती सर्व दिशांना तुम्हाला भिउन        ३६

कस्माच्च ते न नमेरन्महात्मन्
गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे ।
अनन्त देवेश जगन्निवास
त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् ॥         ३७

ब्रह्माहुनिही श्रेष्ठ असे तुम्हि आहात निर्माते
महात्मना, मग कां न करावे वंदन तुम्हांते?
अनंतदेवा, अधिदेवा, तुम्हि आधार जगतासी
सत्यअसत्यापलिकडले तत्वहि तुम्ही अविनाशी    ३७

त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्-
त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
वेत्तासि वेद्यं च परं च धाम
त्वया ततं विश्वमनन्तरूप ॥        ३८

पुराणपुरूषा, आदिदेव तुम्हि, जगताचा आश्रय
तुम्ही ज्ञान अन् तुम्हीच ज्ञानी, परंज्ञाननिलय 
अनंतरूपे, हे परमेशा, जगत् तुम्ही व्यापिले
सर्व विश्र्व हे केवळ तुमच्यावरती आधारिले        ३८

वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः
प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च ।
नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः
पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥           ३९

तुम्हीच वायू, यम, अग्नि, जल, तुम्हिच चंद्रमा तो
प्रजापती प्रपितामह तुम्ही, तुम्हास मी वंदितो
वारंवार करुनिही नमन मी नमितो पुन:पुन:
सहस्त्रश: वंदन चरणाशी तुमच्या, नरोत्तमा        ३९

नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते
नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व ।
अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं
सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥           ४०

समोरूनी, मागिल बाजूनी, सर्व दिशांकडुनी
नमस्कार माझा तुम्हाला हृदयांतरातुनी
सी विक्रमी, शक्तिमान तुम्ही, तुम्हि अनंतवीर्य
सर्वव्यापि तुम्हि, तरी जाणवे तुम्हीच ते सर्व       ४०

सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं
हे कृष्ण हे यादव हे सखेति ।
अजानता महिमानं तवेदं
मया प्रमादात्प्रणयेन वापि ॥        ४१

महिमा तुमचा न जाणुनी संबोधी एकेरीने
कृष्ण, यादवा, सख्या’, साद मी घालीतसे सलगीने  ४१

यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि
विहारशय्यासनभोजनेषु ।
एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं
तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् ॥       ४२

प्रेमापोटी वा चेष्टेमधि घडवियली घटना
एकांती वा परिचितांसवें केली अवहेलना 
खानपान, परिहार, वा शयन अशा कितिक समया
मी मर्यादा ओलांडलि, मज, प्रभो, क्षमादान द्या     ४२

पितासि लोकस्य चराचरस्य
त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् ।
न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो
लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव ॥               ४३

चराचरांच्या या सॄष्टीचे तुम्ही जन्मदाते
गुरू गुरूंचे तुम्हीच देवा, परमपूज्य सृष्टिते
बरोबरीचा दुजा न कोणी, ना कुणि समरूपी
अशक्य कोणी श्रेष्ठ तुम्हाहुन असणे त्रैलोक्यी     ४३

तस्मात्प्रणम्य प्रणिधाय कायं
प्रसादये त्वामहमीशमीड्यम् ।
पितेव पुत्रस्य सखेव सख्युः
प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् ॥           ४४

म्हणुनी तुम्हा वंदन करतो, पूजनीय भगवंत,
कृपा याचितो, अष्टांगाने घालुनि दंडवत
पुत्रासि पिता, मित्रासि सखा, तसे प्रिय प्रियासी
करति क्षमा तद्वत् तुम्हि द्यावे क्षमादान मजसी  ४४

अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा
भयेन च प्रव्यथितं मनो मे ।
तदेव मे दर्शय देव रूपं
प्रसीद देवेश जगन्निवास ॥        ४५

कधि न पाहिलेले मज झाले विश्र्वरूपदर्शन
आनंदित त्यामुळे तरीहि भयव्याकुळ मम मन
जगदाधारा, प्रसन्न व्हा, व्हा पुनरपि अवतीर्ण
आपुल्या भगवद् रूपाचे मज देण्याला दर्शन       ४५

किरीटिनं गदिनं चक्रहस्तं
इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव ।
तेनैव रूपेण चतुर्भुजेन
सहस्रबाहो भव विश्वमूर्ते ॥               ४६

सहस्त्रबाहो, करा एवढी मम इच्छापूर्ती
किरिट- गदा- चक्रधर, चतुर्भुज दावा मज मूर्ती.”     ४६
श्रीभगवानुवाच ।
मया प्रसन्नेन तवार्जुनेदं
रूपं परं दर्शितमात्मयोगात् ।
तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं
यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् ॥           ४७

श्री भगवान म्हणाले
प्रसन्न होउन तुजवर, पार्था, दर्शन तुज दिधले
मम योगाच्या सामर्थ्याने अघटित मी घडविले
कुणा न दिसते विश्र्वरूप जे तुजला दर्शविले
आद्य, अनंत अन् तेजोमय मम रूप तुला दाविले ४७

न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्-
न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः ।
एवंरूपः शक्य अहं नृलोके
द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ॥               ४८

श्रेष्ठ कुरुवीरा, तुझिया आधी कुणीच ना पाहिले
जगड्व्याळ हे विश्र्वरूप मम जे तुजला दिसले
अशा स्वरूपीं इहलोकामधी दुर्लभ मज बघणे
यज्ञाने, वेदाध्ययनाने, तप वा दानाने             ४८

मा ते व्यथा मा च विमूढभावो
दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम् ।
व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं
तदेव मे रूपमिदं प्रपश्य ॥               ४९

घोर रूप मम पाहुनि पार्था, नको घाबरू तू
अथवा चित्तीं व्यथित होउनी गांगरू नको तू
भीति सोडुन शांतपणाने रूप पुन: ते पहा
दर्शन माझे पुनरपि करूनी स्वस्थचित्त तू रहा.”    ४९
सञ्जय उवाच ।
इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा
स्वकं रूपं दर्शयामास भूयः ।
आश्वासयामास च भीतमेनं
भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥            ५०

संजय म्हणाला
वासुदेव अर्जुनासि ऐसे आश्र्वासुन बोलले
आणि आपुले घोर रूप त्या पुन्हा दाखविले
नंतर भगवंताने पार्था दिला धीर खूप
आणि दाविले आपुले प्रेमळ करूणाकरि रूप       ५0
अर्जुन उवाच ।
दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन ।
इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः ॥        ५१

अर्जुन म्हणाला
हे जनार्दना, पाहुनि तुमचे मनुषरूप सुंदर
शांतचित्त होउनि मी आता आलो भानावर.”       ५१
श्रीभगवानुवाच ।
सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम ।
देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः ॥     ५२

श्री भगवान म्हणाले
आता दाविले रूप तुला ते अतिदुर्लभ असते
देवांनाही दर्शनाचि त्या आकांक्षा असते           ५२

नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया ।
शक्य एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ॥       ५३

माझे दर्शन झाले तुज जे प्राप्य न कोणाही
वेदाध्ययने, दानाने वा तप करण्यानेही           ५३

भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन ।
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप ॥         ५४

मला असा पाहणे, जाणणे, मम अंतरि येणे
संभव केवळ माझ्यावरच्या अनन्य भक्तीने       ५४

मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः ।
निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥          ५५

नि:संगपणे भक्तीने जो कर्म करी मजकरिता
अन निर्वैरी मन ज्याचे त्याला ये मजसी मिळता    ५५

इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
विश्वरूपदर्शनयोगो नामैकादशोऽध्यायः ॥

अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
विश्र्वरूपदर्शन नावाचा अकरावा अध्याय पूर्ण झाला.



६ टिप्पण्या:

  1. डॉ. प्रियंवदा कोल्हटकर लिहितात:

    "आपणास ठाऊक असेलच की याच अध्यायातील १२वा दिवी सूर्य सहस्रस्य.. . . श्लोक, ओपनहीमर या शास्त्रज्ञाला atom bomb च्या पहिल्या चाचणी वेळी आठवला होता. अनुवाद आवडला. धन्यवाद. "

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद प्रियंवदाजी,
      हो. ओपनहीमर याने अॅटम बॉंब च्या न्यू मेक्सिको येथे केलेल्या पहिल्या चाचणी स्फोटाच्या वेळी गीतेतील श्लोक उधृत केला होता. परंतु तो, माझ्या माहितीप्रमाणे ३२ वा श्लोक होता. मूळ संस्कृत श्लोक म्हणून मग त्याने त्याचे भाषांतर "Now I am become Death, the destroyer (shatterer) of worlds" असे करून सांगितले होते. (स्रोत: विकीपीडिया)

      हटवा
  2. श्री मुकुंद नवरे कळवतात:

    "सप्रेम नमस्कार.

    या अकराव्या अध्यायाचा भावानुवाद मूळ अध्यायातील विस्मय आणि भय याची प्रचिती आणून देतो यात शंका नाही. यातील श्लोक क्र. २०, २३ ते २५ , ३१ ते ३४ आणि ४७ ते शेवटपर्यंत एकापेक्षा एक सरस वाटले. श्लोक क्र. २३, ४३ , ४४ अप्रतिम साधले आहेत. अभिनंदन .

    मुकुंद नवरे

    तळटीप : श्लोक क्र. २ मधे यमकाबद्दल पुनर्विचार आणि ३२ मधे ' तुझ्याविना होणारही आहे' असे म्हणण्याचा विचार करावा. "

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद नवरेजी.
      ३२व्या श्लोकात आपण म्हणता तशी शब्दरचना केली तर अपेक्षित अर्थच बदलून जाईल. तथापि आपल्याला वाचताना जी अडचण वाटली असेल तिचा विचार करून मी ती ओळ "तुझ्याविनाही होणारच रे सर्वांचा नाश" अशी करत आहे.

      हटवा
  3. श्री सुभाष फडके लिहितात:

    श्री मुकुंदराव कर्णिक,

    अकरावा अध्याय वाचायला आज शांतपणे वेळ मिळाला. अध्याय मोठा असल्याने मला तो तुकड्या-तुकड्यात वाचायचा नव्हता. एकंदर भावानुवाद छान झाला आहे. याच्यावरील अन्य लोकांचे प्रतिसाद वाचून मी त्यांच्याशी सहमत आहे असे म्हणावेसे वाटते. आपण इतके मोठे काम करता आहात ते सर्वोत्कृष्ट दर्जाचे व्हावे या इच्छेने

    फॉन्टसंबंधी काही सूचना/सल्ला द्यावासा वाटतो. विश्र्वा विश्वा, शाश्र्वतशाश्वत यातील मी लिहिलेले श्व हे योग्य आहे. आपल्या ब्लॉगवर जे दिसते ते चुकीचे आहे. अर्थात ही आपली चूक नसून फॉन्टची चूक आहे. मंगल किंवा अक्षरयोगिनी किंवा एरियल युनिकोड एमएस वापरला तर हा प्रश्न निघून जाईल.

    श्लोक १९ मध्ये वन्ही असा शब्द आपण वापरला आहे तो वह्नी असा हवा.

    श्लोक २२ अचंभीत च्या जागी अचंबित हवे

    बाकी सर्व बिनचूक, रसपूर्ण आणि हवा तो भाव पोहोचवणारे आहे.

    धन्यवाद,

    सुभाष फडके

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यवाद सुभाषजी.
    १९ आणि २२व्या श्लोकात दुरुस्ती केली आहे. "श्र्व" बद्दल काय करता येते ते पहातो.
    -मुकुंद कर्णिक

    उत्तर द्याहटवा