अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
साङ्ख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः
इथे सुरू होतोश्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय
सञ्जय उवाच ।
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥१॥
अश्रूंनी डोळे डबडबलेले आणि मन खिन्न
अशा अर्जुना पाहुनि वदते झाले मधुसूदन १
श्रीभगवानुवाच ।
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥२॥
“आर्यांना शोभा ना देती असली ही तर्कटे
कुठून तुझिया मनात, पार्था‚ आली ही जळमटे २
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥३॥
नको दाखवू नामर्दपणा जो लांछनकारी
खंबीरपणे युध्द कराया ऊठ‚ धनुर्धारी” ३
अर्जुन उवाच ।
कथं भीष्ममहं सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥४॥
अर्जुन म्हणाला‚
अर्जुन म्हणाला‚
श्रीकृष्णा‚ हे भीष्म‚ द्रोण या परमपूज्य व्यक्ती
त्यांना मारायासाठी मी आणु कुठुन शक्ती ४
गुरूनहत्वा हि महानुभावान्
श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव
भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥५॥
माखावें त्यांच्या रक्ताने अयोग्य त्याहून ५
यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।
व हत्वा न जिजीविषामस्-
तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥६॥
आम्हि जिंकावे अथवा त्यानी या पर्यायात
मला केशवा योग्य काय ते हे नाही कळत
ज्याना मारुन आम्ही उरावे हे न मना पटते
तेच उभे सामोरी लढण्या‚ मम कौरव भ्राते ६
पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः ।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे
शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥७॥
सांग केशवा शिष्य तुझा मी‚ शरण येत तुजसी ७
न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्
यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं
राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥८॥
स्वर्गधरेचे राज्य दिले तरि कुणि न सांगू शकते
अनुत्तरित शंका हि सर्वथा मनास मम शोषते ८
सञ्जय उवाच ।
एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तप ।
न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥९॥
संजय म्हणाला‚
संजय म्हणाला‚
इतुके सारे सांगुनी अर्जुन कृष्णासी बोलला
“नाही मी लढणार” म्हणुनिया स्तब्ध उभा राहिला ९
तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥१०॥
दोन्ही सैन्यांमध्ये थांबल्या खिन्न अर्जुनाला
अस्फुटसे हसुनिया कृष्ण मग वदले या बोला‚ १०
श्रीभगवानुवाच ।
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥११॥
श्री भगवान म्हणाले‚
“शोकासाठी पात्र जे न, तू विचार त्याचा करिशी
आणिक मोठया विद्वानासम भाषण पण देशी
अरे कुणी जगला वा मेला शोक न पंडित करती
अन् मरण्या मारण्यावरून तुझि कुंठित होते मती ? ११
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥१२॥
असे न की मी‚ तू‚ हे राजे‚ नव्हतो पूर्वी कधि
असेहि नाही की आपण यापुढे न होणे कधी १२
देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥१३॥
जो जन्मे त्या येइ बालपण‚ यौवन‚ वृध्दपणा
अन् मग मिळते शरीर त्या दुजे ही तर क्रमधारणा
हे ठाउक ज्या ते ज्ञानीजन पडति न मोहात
कारण त्याना ज्ञात कि सारे असते क्रमप्राप्त १३
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥१४॥
हे कुन्तिसुता‚ शीतउष्ण वा सुखदुखकारक जे
येते‚ जाते‚ संतत नसते‚ सहन करी तू ते १४
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥१५॥
ज्या पुरूषाला या सर्वांची व्यथा न बाधे तो
सुखदु:खाला समान मानुनि अमरत्वा जातो १५
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥१६॥
जें ‘आहे’ ते ‘नाही’ नसते जे ‘नाही’ ते ‘असते’ ना
ज्ञानी जाणति पूर्णपणें ‘आहे–नाही’ च्या तत्वाना १६
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥१७॥
ज्या शक्तीने केलि निर्मिती अन् राहे व्यापून
तिच्या विनाशा समर्थ कुणिहि नसे‚ कुन्तिनंदन १७
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ॥१८॥
नाशवंत देहांचा धारक ‘आत्मा’ अविनाशी
जाणुनि घे अर्जुना‚ आणि हो तयार युध्दासी १८
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥१९॥
आत्मा मारी सर्वांना अन् स्वत:हि पावे मरण
असे समजती जे जे कोणी ते ते अनभिज्ञ १९
न जायते म्रियते वा कदाचिन्
नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे ॥२०॥
नाही जन्मत‚ मरतहि नाही आत्मा चिरंजिवी
आज असे अन् पुन्हा न होइल असाहि तो नाही
चिरंजीव अन् पुरातन असा हा आत्मा आहे
नाश पावली जरी शरीरे तरी उरून राहे २०
वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् ।
कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥२१॥
आत्म्याचे अविनाशि रूप हे असे जया अवगत
तो कैसा मारील‚ मारविल कुणासही‚ पार्थ ? २१
वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णा-
न्यन्यानि संयाति नवानि देही ॥२२॥
सहजपणे जैसी मनुजाने वसने बदलावी
तशीच आत्मा जीर्ण शरीरे त्यागुनी चढवी नवी २२
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥२३॥
शस्त्रे नाहित समर्थ चिरण्या यास‚ अग्नि जाळण्या
पाणी पण असमर्थ भिजवण्या‚ वाराही शोषण्या २३
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥२४॥
शस्त्र‚ अग्नि‚ जल‚ वारा याना करी पराभूत
सर्वव्यापि अन् स्थिर सदैव हा आत्मा कालातीत २४
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥२५॥
अविकारी‚ अव्यक्त आणि समजाया कठिणतर
ऐशा आत्म्या जाणुन घेउनि शोक तुझा आवर २५
अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् ।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥२६॥
आणि जरी तू मानत असशिल जन्मुनि मरतो हा
तरी तयास्तव शोक मांडणे तुला न दे शोभा २६
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥२७॥
जो जन्मे त्या मरणे आणि मॄता पुन्हा जन्मणे
असते हे अनिवार्य जाण अन् टाळ शोक करणे २७
अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिवेदना ॥२८॥
प्राणिमात्र अदॄश्य आधि अन् मध्यकाली दॄश्य
पुन्हा अंति अदृश्य होति, मग शोक अनावश्य २८
आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेन-
माश्चर्यवद्वदति तथैव चान्यः ।
आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति
श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥२९॥
कुणास भासे नवल‚ वर्णितो कुणी नवलवत् हा
कुणी ऐकितो नवलच याचे‚ तरि कुणा न ठावा २९
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥३०॥
अवध्य हा आत्मा सजिवांच्या शरिरांचा स्वामी
म्हणुन शोक सजिवांस्तव करणे ठरते कुचकामी ३०
स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥३१॥
धर्मोचित युध्दापरि श्रेयस्कर ना काहीही
युध्दापासुन विचलित होणे क्षात्रधर्म नाहीं ३१
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥३२॥
स्वर्गाचे जणु द्वार असे हे धर्मयुध्द जाण
भाग्यवंत क्षत्रियास केवळ मिळतो हा मान ३२
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥३३॥
तरि धर्मोचित युध्दाला जर नकार तू देशी
स्वधर्म आणि कीर्ति गमावून पापभार घेशी ३३
अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् ।
सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥३४॥
छी थू होइल तव कौंतेया‚ साऱ्या लोकात
मरणाहुनिही दु:खद ऐसी होइल दुष्कीर्त ३४
भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः ।
येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥३५॥
रणावरूनि पळणारा म्हणुनी तुझ्याकडे बघतील
प्रतिष्ठा तुझी विसरून तुजला कस्पटाशि तुलतील ३५
अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः ।
निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् ॥३६॥
नको नको ते शब्द बोलतिल तव कुवतीविषयी
अशी कुचेष्टा ऐकुन घेणे होइल दुखदायी ३६
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥३७॥
रणात मरूनी स्वर्ग मिळवशिल‚ विजयि होउनी राज्य
ऊठ करोनी विचार याचा हो युध्दाला सज्ज ३७
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥३८॥
सुखदु:ख तसे नफा नि तोटा जय नि पराजयही
उभयाना सारखे गणुनि‚ लढ त्यात पाप नाही ३८
एषा तेऽभिहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥३९॥
इथवर पार्था मी सांगितला सांख्ययोग तुजप्रती
कर्मयोग हा ऐक आता जै कर्मबंध तुटती ३९
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥४०॥
प्रारंभित कर्माचा त्याने नाश नाहि होत
अल्पहि पालन या योगाचे करी भीतिमुक्त ४०
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥४१॥
कर्में निश्र्चित करते जी ती बुध्दि हवी एकाग्र
विचलित बुध्दीचे नर होती वासनांमुळे व्यग्र ४१
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥४२॥
वेदांमधल्या कर्मकांडपर वाक्यांना भुलणारे
वेदविशारद समजतात कर्माविण काहि न दुसरे ४२
कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥४३॥
‘नानाविध कर्मे केल्यावर होते फलप्राप्ती
जी असते ऐश्र्वर्यभोग’ ऐसे ते प्रतिपादिती ४३
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥४४॥
भोग आणि ऐश्र्वर्यामागे जे हे पळतात
बुध्दि तयांची होउ न शकते स्थिर समाधिस्त ४४
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥४५॥
सत्व रज तम या त्रिगुणानी भरलेले वेद
त्रिगुणांच्या पलिकडे अर्जुना‚ हो तू स्वयंसिध्द ४५
यावानर्थ उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥४६॥
महापूर पाणी असता जे महत्व विहिरीचे
ज्ञानी पुरूषाना बस् तितुके कौतुक वेदांचे ४६
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥४७॥
कर्म करावे‚ करित रहावे हाच हक्क तुजला
कर्मफलाचा वाटा मिळणे हा नाही दिधला
फलप्राप्ति झालीच पाहिजे असा नसे न्याय
फलाअभावी कर्म न करणे हा नच पर्याय ४७
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय ।
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥४८॥
अनासक्त होऊन कर्म कर योगाच्या ठायी
कार्यसिध्दि हो वा ना हो तरि निर्विकार राही
यश अपयश मानुनी एक अन् राहुनि नि:संग
कर्म असे करण्यास अर्जुना‚ नाव कर्मयोग ४८
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय ।
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥४९॥
कर्म कधीही कनिष्ठ ठरते समबुध्दीपेक्षा
बापुडवाणे मनात धरती कर्मफल अपेक्षा ४९
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥५०॥
पाप पुण्य दोन्हीतुन राही अलिप्त समबुध्दी
चतुरार्इने आचर कर्मे हीच कर्मबुध्दी ५०
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥५१॥
कर्मफलाला दुर्लक्षिति जे राहुनी अलिप्त
जन्मबंधनापासुन होती ऐसे नर मुक्त ५१
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥५२॥
गढुळ मोहपर्यावरणातुन मुक्त जधि होशी
ऐकलेस त्या‚ ऐकशील त्या वेदां कंटाळशी ५२
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥५३॥
अन् वेदांनी कुंठित मति तव होइल स्थिर जेव्हा
स्थिरबुध्दी तुज कर्मयोग होइल प्राप्त तेव्हा ५३
अर्जुन उवाच ।
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥५४॥
अर्जुन म्हणाला‚
सांग‚ केशवा‚ मज स्थिरबुध्दी मनुजाची लक्षणे
कैसे त्याचे उठणे‚ बसणे‚ अन् कैसे बोलणे? ५४
श्रीभगवानुवाच ।
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥५५॥
श्रीभगवान म्हणाले‚
सर्व कामना तशा वासना सोडुनि जो तुष्ट
तो स्थिरबुध्दी अलिप्ततेने राहि आत्मनिष्ठ ५५
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥५६॥
दु:खामधि ना खेद जया‚ ना सुखात आसक्ती
स्थिरबुध्दी तो सुटली ज्याची प्रेम‚ राग‚ भीती ५६
यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् ।
नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥५७॥
या सर्वांतुनी मुक्त होउनी हो ज्याची शुध्दी
शुभाशुभाचा मोद खेद ना ज्या तो स्थिरबुध्दी ५७
यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥५८॥
कासव जैसे अवयव आपुले घेइ आवरून
तसा विषयवासना आवरून धरी स्थितप्रज्ञ ५८
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥५९॥
निराहारिचे भोजन सुटते परी न रसभक्ती
परमज्ञान मिळता पण सुटते सर्वच आसक्ती ५९
यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः ।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥६०॥
परमज्ञान ना‚ अन् आचरिती दमन इंद्रियांचे
सुप्तवासनांमध्ये भरकटे मनमानस त्यांचे ६०
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।
वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥६१॥
संयम करूनी होती जे मम ठायी परायण
त्यांच्या स्वाधिन त्यांची इंद्रिये तेच स्थितप्रज्ञ ६१
ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥६२॥
विचार मनि जो करि विषयाचा‚ होई आधीन
आधिनता मग जने वासना‚ राग वासनेतुन ६२
क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥६३॥
रागातुन जन्मतो मोह जो करी स्मरणऱ्हास
विस्मरणाने बुध्दि फिरे‚ तदनंतर हो नाश ६३
रागद्वेषविमुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥६४॥
अंकुश ठेवी मनावरी तो असे स्थितप्रज्ञ
रागद्वेषविरहीतपणे घे भोग‚ तरि प्रसन्न ६४
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥६५॥
अन् प्रसन्न मन करते साऱ्या दु:खांचे हरण
प्रसन्नमन जो तो स्थिरबुध्दी हे निश्र्चित जाण ६५
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् ॥६६॥
अस्थिर बुध्दी ज्याची तो भावनाशील नसतो
शून्य भावना ज्याला तो कधि शांती न मिळवतो ६६
इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥६७॥
विषयवासनांच्या मागे मन स्वैर धाव घेई
वारा जैसी पाण्यावरली नौका भिरकावी ६७
तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥६८॥
जये इंद्रियांना आवरले मन करूनी ठाम
ते नर करती स्थिर आपुली बुध्दी निष्काम ६८
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥६९॥
जागा राही‚ जग सारे असताना झोपेमधीं
अन् जग जागे असता झोपे तो नर स्थिरबुध्दी ६९
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं
समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे
स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥७०॥
तुडुंब भरला सागर राही बंद किनाऱ्यात
तरिहि पुराचें पाणी समावे त्याच्या उदरात
तसा शांत स्थितप्रज्ञ, असुनिही विषयज्ञान त्याला
अशी शांति नच लाभे कधिही विषयलोलुपाला ७०
विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः ।
निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥७१॥
सर्व कामना त्यागुनि जगतो जो निरिच्छवृत्ती
निगर्वी तसा निर्मोही हो त्यास शांति प्राप्ती ७१
एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥७२॥
अशी स्थिती ही ब्राह्मी म्हणुनी ओळखली जाई
मिळता जी मनुजाला कसला मोह कधि न होई
अशा स्थितित जरि मनुष्य राहिल अंतिम समयाला
तरि ब्रह्मनिर्माणस्वरूपी मोक्ष मिळे त्याला ७२
इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
साङ्ख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः
अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला.
श्री मुकुंद नवरे यांनी वि-पत्राद्वारे पुढीलप्रमाणे अभिप्राय कळवला आहे.
उत्तर द्याहटवासप्रेम नमस्कार.
हे मराठी रूपांतर वाचल्यावर मी खालील अभिप्राय देत आहे : श्लोक क्र. सोबत दिला आहे.
काही शब्दप्रयोग मला खटकले . नामर्दपणा (३), बदतर (५), काबू (६४).
(६) मधे ....सामोरी लढण्या , (७) मधे ....शरण येत तुजसी , (११) मधे ....कुंठित का मती ? अशी शब्दरचना असेल तर गेयता येईल असे वाटते. माझे मत स्पष्टपणे दिले, कृपया राग मानू नये.
१६ ते १९, २१, २२,२५, २६ , २७, ३१ श्लोक मला छान वाटले .
२३ आणि ३१ हे श्लोक उत्तम साधले आहेत आणि हे महत्वाचे श्लोक असल्याने हे आपले सुयश आहे. . अभिनंदन.
कर्मयोगातील ४१ व ४७ मला उत्तम वाटले व ४८, ५४, ५५, ५६, ५८, ६० व ७० छान वाटले.
एकंदरीत आपला उपक्रम मला आवडला .
मुकुंद नवरे
नवरेसाहेब,
हटवासप्रेम नमस्कार.
आपल्या इतक्या तत्परतेने आलेल्या अभिप्रायाबद्दल मी मनापासून आभारी आहे. आपले निरिक्षण अचूक आहे यात शंकाच नाही. आपल्याला खटकलेले बदतर आणि काबू हे परक्या भाषेतील शब्द वापरणे मलादेखील लिहिताना फारसे रुचत नव्हते परंतु गेयतेच्या दृष्टीने मला तिथे समर्पक असे पर्यायी शब्द सुचले नाहीत. नामर्दपणा हा शब्द अर्जुनाला त्याची निर्भत्सना अधिक तीव्रपणे जाणवावी या भूमिकेतून वापरला. मूळ संस्कृत श्लोकात तितका प्रखर शब्दप्रयोग नाही परंतु माझ्या लेखनासाठी मी 'भावानुवाद' असे स्वरूप नियोजित केले असल्यामुळे हे स्वातंत्र्य मी घेतले आहे हे मान्य करतो.
गेयतेच्या दृष्टीने आपण सुचवलेले पहिले दोन शब्दप्रयोग अत्यंत समर्पक आहेत. तेव्हा लवकरच मी त्याप्रमाणे सुधारणा करीत आहे. तिसरा 'कुंठित का मती' हा प्रयोग मात्र मला तितकासा पर्याप्त वाटत नाही.
आपल्या बहुमोल अभिप्रायाचे मी स्वागत करून पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि इथून पुढेही आपण असाच प्रांजळ अभिप्राय देत राहावे ही विनंती करतो.
मुकुंद कर्णिक
श्री सुभाष फडके यांनी वि-पत्राद्वारे पुढील अभिप्राय कळवला आहे.
उत्तर द्याहटवाश्री. मुकुंदराव कर्णिक,
महाद्वारवरील आपले गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचे मराठी रूपांतरण वाचले. फारच कष्टाचे काम आहे आणि त्यावर काही बोलायचा मला अधिकारही नाही. काही मुद्दे उपस्थित केले तर आपण राग मानणार नाही असे समजून थोडी धिटाई दाखवतो आहे. माझा उद्देश आपले हे काम अजून सुंदर व्हावे हा आहे.
आपण प्रत्येक श्लोकात यमक जुळवण्याचा प्रयास करत आहात, परंतु त्याने काही काही ठिकाणी गेयतेमध्ये बाधा येते असे वाटले. स्थितप्रज्ञ सारख्या मूळ संस्कृत शब्दांना संधि-समासाविना मराठीत वळवणे हे अतिशय अवघड काम आहे. मूळ संस्कृत गीतेमध्येही यमक गौण आहे आणि ज्या त्या छंदाप्रमाणे शब्दरचना केली आहे, हे लक्षात घेता यमकाचा आग्रह जरा शिथिल करून गेयतेकडे अधिक लक्ष केंद्रित केले, तर अजूनच छान रूपांतरण होईल असे मला वाटते.
आपल्या या कामावर बोलून लहान तोंडी मोठा घास घेतो आहे तरी त्यामागील भावना लक्षात घ्यावी ही विनंती.
धन्यवाद,
सुभाष