उपोद्घात
ख्रिस्तपूर्व ३१०२ या वर्षात कुरूक्षेत्रावर
महाभारत युध्द सुरू होण्याच्या ऐन वेळी अर्जुनाच्या मनावर स्वकीयांवरील प्रेमापोटी
मळभ आले. ते मळभ दूर सारून त्याला पुन्हा क्षात्रधर्मानुसारचे आपले कार्य करायला उद्युक्त
करण्यासाठी म्हणून भगवान श्रीकृष्णानी त्याला रणभूमीवर केलेला उपदेश‚ आणि त्या अनुषंगाने
अर्जुनाला आलेल्या शंकांचे निरसन करावे म्हणून सविस्तर सांगितलेले ज्ञान‚ यातून हा गीतोपनिषदाचा
ग्रंथ बनला आहे जो ‘श्रीमद्भगवद्गीता’ अथवा सुटसुटीतपणे ‘गीता’ या नावाने ओळखला जातो.
गीता ही अठरा अध्यायांत विभागलेली आहे आणि या अठरा अध्यायात
एकूण सातशे एक श्र्लोक आहेत. (गीतेच्या काही प्रतींमध्ये तेराव्या अध्यायातील पहिला श्र्लोक
प्रक्षिप्त मानून गाळला गेलेला आहे. तो गाळल्यास एकूण श्र्लोकसंख्या सातशे होते).
- अध्याय पहिला अर्जुनविषादयोग श्र्लोकसंख्या ४७
- अध्याय दुसरा सांख्ययोग श्र्लोकसंख्या ७२
- अध्याय तिसरा कर्मयोग श्र्लोकसंख्या ४३
- अध्याय चौथा ज्ञानकर्मसंन्यासयोग श्र्लोकसंख्या ४२
- अध्याय पाचवा संन्यासयोग श्र्लोकसंख्या २९
- अध्याय सहावा आत्मसंयमयोग श्र्लोकसंख्या ४७
- अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग श्र्लोकसंख्या ३०
- अध्याय आठवा अक्षरब्रह्मयोग श्र्लोकसंख्या २८
- अध्याय नववा राजविद्याराजगुह्ययोग श्र्लोकसंख्या ३४
- अध्याय दहावा विभूतियोग श्र्लोकसंख्या ४२
- अध्याय अकरावा विश्र्वरूपदर्शनयोग श्र्लोकसंख्या ५५
- अध्याय बारावा भक्तियोग श्र्लोकसंख्या २०
- अध्याय तेरावा क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग श्र्लोकसंख्या ३५
- अध्याय चौदावा गुणत्रयविभागयोग श्र्लोकसंख्या २७
- अध्याय पंधरावा पुरूषोत्तमयोग श्र्लोकसंख्या २०
- अध्याय सोळावा दैवासुरसंपद्विभागयोग श्र्लोकसंख्या २४
- अध्याय सतरावा श्रध्दात्रयविभागयोग श्र्लोकसंख्या २८
- अध्याय अठरावा मोक्षसंन्यासयोग श्र्लोकसंख्या ७८
या अठरा अध्यायांत मिळून अर्जुनासाठी केवळ
‘युध्द कर’ एवढाच उपदेश नाही.
चारी वर्णां साठी स्वभावधर्माप्रमाणे
नियोजित असलेली आपआपली कर्मे करण्यामध्ये पाप नसून ईश्र्वरावर नितांत भक्ती आणि विश्र्वास
ठेऊन‚ निरिच्छ बुध्दीने‚
म्हणजे फलाची आशा न
धरता आणि‚ ‘हे मी त्या परम् ईश्र्वरासाठी
करतो आहे’ ही भावना बाळगून केली तर त्या त्या कर्मात असलेल्या नसलेल्या सर्व दोषांचे आपोआप
निवारण होते. किंबहुना कर्मे करणाऱ्याला जरी ती तो स्वत: करतो आहे असे वाटत असले तरी ती सारी त्या परम् ईश्र्वराच्या
प्रेरणेवरून घडत असतात. त्यामुळे कर्म करणेच नको अशी भावना धरून निष्कर्मी रहाणे अथवा
कर्मसंन्यास घेणे हे व्यर्थ आणि त्या परम् ईश्र्वराच्या आदेशाच्या बाहेर होईल म्हणून
तसे करणे टाळावे. फलाची अपेक्षा न धरता नियोजित कर्मे करून
ईश्र्वराची भक्तीपूर्वक आराधना केली म्हणजे मनुष्याला पुनर्जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ति मिळते. असे हे ब्रह्मज्ञान
स्वत: भगवान श्रीकृष्णाने कुरूक्षेत्रावरील महाभारतयुध्दाच्या निमित्ताने अर्जुनाला
दिले. त्याला युध्द करण्याने आपणच आपल्या आप्तजनांचा संहार करणार असल्याबद्दलची
जी शंका होती ती स्वत:च्या परम् ईश्र्वर या विराट स्वरूपाचे दर्शन दाखवून आणि तो संहार
अर्जुन नव्हे तर आपण स्वत:च करीत असल्याचे स्पष्ट करून निवारण केली आणि अर्जुनाच्या
मनावर आलेले मोह आणि अज्ञानाचे सावट दूर करून त्याला त्याचे क्षत्रियाकडून अपेक्षित
असे असलेले युध्दकर्तव्य पार पाडण्यास प्रवृत्त केले.
हे सारे ज्ञान संजय‚ जो त्याला व्यासमुनीनी
दिलेल्या दिव्य दॄष्टीमुळे कुरुक्षेत्रावरील घटनाक्रम बसल्या जागेवरून समक्ष पाहू शकत
होता‚ याने धृतराष्ट्रासाठी वर्णन केलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या
संवादाच्या रूपात पण मराठी श्र्लोक स्वरूपात मी पुढे सादर करत आहे.
संस्कृत भाषेत समास आणि संधि
यांच्या सहाय्याने वाक्यरचना छोटया स्वरूपाची करता येते मराठीत तसे संधिरूपातले
शब्द वापरण्याने दुर्बोधता येते ती टाळावी आणि मूळ श्र्लोकाचा संपूर्ण
अर्थ मराठी रचनेत यावा म्हणून काही श्र्लोक दोन चरणांऐवजी चार अथवा प्रसंगी आठ चरणांचेही
केले आहेत. श्र्लोकाचे मराठीतील रुपांतर देताना त्याच्या आधी मी गीतेतील संस्कृत श्र्लोकही या आवृत्तीत दिलेला आहे. यात कोणा वाचकाला मूळची संस्कृत भाषेतील भगवद्गीता वाचायची उत्सुकता असेल तर त्याचेही समाधान व्हावे हा माझा उद्देश आहे.
हे मराठीकरण करताना मूळ संस्कृतमधील ‘गीतोपनिषद’‚ कै. विनोबा भावे यांची
‘गीताई‚ कै. लोकमान्य टिळकांनी केलेला मराठी गद्यात्मक अनुवाद ‘श्रीमद्भगवद्गीता मूळ श्र्लोक व भाषांतर’‚ ‘भावार्थ दीपिकाज्ञानेश्र्वरी’‚ श्री भक्तिवेदांत स्वामी
प्रभुपाद यांचे अनुवादित पुस्तक ‘भगवद्गीता जशी आहे तशी’ आणि इंटरनेटवरून उपलब्ध
असलेली माहिती या साऱ्यांचे परिशीलन करून मी हा प्रयत्न केला आहे.
संत एकनाथांच्या मूळ श्लोकात थोडा बदल केला तर ‘ज्ञानेश्र्वरांचिये पाठी ओवी करोनि
मऱ्हाटी, मी अमृताचिये ताटी नरोटी ठेविली’ असेल. तरीही आजच्या प्रचलित
मराठी बोलीत रूपांतर केलेली गेय स्वरूपातली गीता लोकाना समजणे सोपे जाईल अशा प्रामाणिक
मनोभावनेनेच हा प्रमाद मी केला आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडेल अशी आशा करतो.
दुबई
प्रिय मुकुंद कर्णिक,
उत्तर द्याहटवाआपण सुरू केलेल्या भगवत गीतेच्या श्र्लोकाला श्र्लोक हा उपक्रम खूपच आवडला. आपले अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. सध्या मी विनोबांची गीताई वाचत आहे. आपला मी कायमचा वाचक आहे. पुनःश्र्च आपले अभिनंदन.
भास्कर जोशी